मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे निकालानंतर भाजपसोबत जातील, अशी चर्चा आहे. त्यावरच शरद पवार यांनी विधान केले. ‘निकालानंतर कुठले पक्ष भाजपसोबत जातील, हे मी सांगू शकत नाही. पण महाराष्ट्रासारखी परिस्थिती देशात निकालानंतर आली तर आमच्यासारखे लोक समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील’, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरे निकालानंतर मोदींसोबत जातील, अशी चर्चा सुरू झाली. प्रकाश आंबेडकरांनीही असाच दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘देशाला स्थिर सरकार देण्यासाठी एक समान कार्यक्रम बनवून जर संधी असेल तर त्याचा पूरेपूर फायदा घेऊ. उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील याची अजिबातच शक्यता नाही’.
तसेच ते पुढे म्हणाले, भाजपने 75 वर्षांची वयोमर्यादा ठरवली आहे. त्यात ते आतापर्यंत प्रामाणिक दिसताहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन यांना वयाचे सूत्र वापरून बाजूला केले. तेच मोदींनाही लागू पडेल. या तिघांबाबत जो निर्णय घेतला गेला, तो मोदींबाबतही आज ना उद्या घेतला जाईल’.