Uddhav Thackeray: आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करणार आहे, इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना फोन कऱणार आहे. देशावर प्रेम करणाऱ्या एनडीए खासदार सुदर्शन रेड्डी यांना मतदान करू शकतात. कोणत्याही प्रकारचा चमत्कार घडू शकतो. देशावर प्रेम करणाऱ्यांनी रेड्डी साहेबांना निवडून द्यावे,” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुदर्शन रेड्डी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणाऱ्या जगदीप धनखड यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जगदीप धनखड उपराष्ट्रपती होते आणि प्रकृतीचं कारण सांगून अचानक गायब झाले. त्यांच्याविषयी कुणाला काहीही माहिती नाही. हे सर्वकाही गूढ वाढवणार आहे. पण बी. सुदर्शन रेड्डी हे आमच्या इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतीपदलाही एक सन्मान आहे. त्यामुळे या पदावर एक जबाबदार व्यक्ती बसली पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे ज्या खासदारांचे देशावर प्रेम आहे. त्यांनी रेड्डींना मतदान केलं पाहिजे असं आवाहन मी करतो. मी आज देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहे, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता, हेही खरं आहे. पण त्यांनी माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला तर त्यांच्या विनंतीला काय अर्थ आहे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी त्यांनी न मागता मतदान केलं होतं. पण औपचारिकता म्हणूनही त्यांनी कधी मला धन्यवाद दिले नाहीत. आता गरज असेल तेव्हा वापर करा आणि गरज संपली कीफेकून द्या या पद्धतीलाच आता नाकारलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमुद केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, देश एका विचित्र परिस्थितीत नेला जातोय. अशा परिस्थितीत देश जाऊ द्यायचा नसेल तर ही परिस्थिती इथेच थोपवली पाहिजे. तरच देशातील लोकशाही वाचेल. आधीच १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपला देश मुक्त झाला आहे. त्या गुलामगिरीकडे देश पुन्हा जाणार नाही, हेही पाहिलं पाहिजे. संख्याबळावर जर निवडणूक अवलंबून असती तर निवडणूक घेण्यातच अर्थ नाही. मतदानात गोपनीयता आहे. त्यामुळे देशाबद्दल छुप्या पद्धतीने प्रेम असलेले एनडीएतील खासदारसुद्धा आम्हाला मतदान करू शकतात. राज्यसभा आणि लोकसभेचा कारभार कसा चालतो आहे, हे सगळेच पाहत आहेत.
२१ जुलै रोजी जगदीप धनखड यांनी अचानक आरोग्याच्या कारणास्तव उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. यासाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.