खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून मोर्चा काढत मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांसह उपोषण सुरु केले आहे. मात्र जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसाच्या उपोषणाची परवानगी देण्यात आली आहे तर गुलाल उधळल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. याच परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जरांगे पाटील यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस आपला न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचे काम नाही तर सरकारचं काम आहे. हे राज्याच्या गृह खात्याचे काम आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काम मुख्यमंत्री आहे,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “अप्रत्यक्षपणे कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत असेल तर आपण राज्याच्या मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे कोण आहे. एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यांना राजकारण काय दिसत आहे. आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेल्या आहात तेव्हा आपण या प्रश्नांना चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलं, मिस्टर फडणवीस,” असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव सार्वजनिक, मला विश्वास आहे हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला सार्वजनिक गणेश उत्सवाला डिस्टर्ब न करता त्यांचे आंदोलन करतील. सरकारने या राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटत आहे भडका उडेल कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिली आहे. त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे, मी त्याला समस्या न बोलता असं बोलेल मागण्यांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना, मराठा आंदोलकांना भेटून चर्चा केली पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.