पुरंदर एअरपोर्टसाठी 1 हजार 285 हेक्टर जमिनीचे संपादन
शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींचा मोबदला मिळणार
दिवाळीनंतर रक्कम अदा केली जाण्याची शक्यता
पुणे: पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील विमानतळासाठी 1 हजार 285 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, या जमीनीपोटी संबंधित शेतकऱ्यांना किमान साडेचार हजार कोटी रूपये अदा करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व अन्य संस्थांच्या माध्यमातून ही रक्कम दिवाळीनंतर अदा केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान पुरंदर विमानतळाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे. यापैकी कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी या तीन गावांमधील 720 हेक्टर जमीनीची मोजणी पूर्ण झाली आहे.
उर्वरित गावांमधील मोजणी प्रक्रिया येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. महसुल, जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा, वन विभाग आदी संबंधित विभागातील अधिकारी यांच्या सहा टीम तयार करून या गावांमधील मोजणी पूर्ण केली जात आहे. जेथे मोजणी केली जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच कल्पना दिली जात असल्याने शेतकरीही स्वत: उपस्थित राहून सहकार्य करीत असल्याचे डुडी यांनी सांगितले.
Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित जमिनीच्या मोजणीस सुरुवात; शेतकऱ्यांना अश्रू…
जमीनीची मोजणी पूर्ण झाल्यावर सर्व गावकऱ्यांचे गट करून त्यांच्याशी मागणी व मोबदला याबाबत चर्चा करून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. व 15 नोव्हेंबरनंतर निधीचे वितरण केले जाणार असल्याचे डुडी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार
पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी संपादित करण्यात येणार्या सात गावांमधील जमीनीचा मोबदला हा मोठा आहे. या पैशाचा विनियोग संबंधित शेतकर्यांनी व त्यांच्या पुढील पिढीने योग्य रितीने करावा यासाठी हा पैसा कसा वापरावा, कुठे गुंतवावा. याबाबत मोठया अर्थ विषयक काम करणार्या शैक्षणिक संस्थांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डुडी यांनी यावेळी सांगितले.
पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार असून, यापैकी कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी या तीन गावांमधील ३२१ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या प्रांत वर्षा लांडगे यांनी माहिती दिली.
Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात
पुरंदर तालुक्यातील ज्या सात गावांमधील जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे, त्याच्या मोजणीची सुरुवात शुक्रवार पासून करण्यात आली. रविवारचा दिवस वगळता या चार दिवसात म्हणजे आजपर्यंत ३२१ हेक्टर जमिनी प्रत्यक्ष मानवी मोजणी करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाचे म्हणजेच महसुलचे १५० कर्मचारी कार्यरत आहेत. या सातही गावातील जमिनीची मोजणी येत्या २० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.