मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपने जर 400 चा आकडा पार केला असता तर त्यांनी तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे. याचवेळी या लेखात त्यांनी भाजप आणि आरएसएसवरही चांगलीच आगपाखड केली आहे. तसेच, भाजपने 400 चा आकडा पार केला असता तर तीन गोष्टी नक्कीच केल्या असत्या असेही त्यांनी सांगितले.
“ज्यांनी भारतीय तिरंग्याचा द्वेष केला व स्वातंत्र्यानंतरही 56 वर्षे तिरंगा फडकवणारच नाही अशा विचारधारेचे वंशज सत्तेवर आहेत व सत्ता आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचे योगदान नसलेले लोक मागच्या दहा वर्षांपासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत व देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत आहेत.पण लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत असताना कश्मीरात पुन्हा आमच्या जवानांनी बलिदान दिले. तिरंगा म्हणूनच सुरक्षित आहे.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. “तिरंगा राष्ट्रासाठी अशुभ ठरेल. कारण तीन संख्या हिंदू धर्मासाठी अशुभ असते,” असा तर्क श्री. गोळवलकर गुरुजी यांनी मांडला होता.
अयोध्येतील राममंदिरात पहिल्याच पावसात गळती लागली, विजेचे खांब चोरीला गेले, याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधले आहे. “लोकसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने मंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव अयोध्येत पार पाडला, पण राम त्यांना पावला नाही. मोदी यांच्या काळात अयोध्येचे नवे राममंदिर गळत आहे व श्रीरामाच्या गर्भगृहात रामाच्या बचावासाठी छत्री धरावी लागत आहे. संपूर्ण अयोध्येत चोरांचे राज्य निर्माण झाले आहे. रामपथावर लावलेल्या 3,800 बाम्बू लाईट आणि 36 गोबो प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले. रामपथावर आज अंधार आहे. जणू रामराज्य भाजपने अंधारात बुडवले. चोरांनी रामालाही सोडले नाही. हे यांचे कायद्याचे राज्य! या राज्याची चौकीदारी मोदी व शहा करीत आहेत,’ असे टोलाही त्यांनी लगावला.
भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर .1) भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती. 2) संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते. 3) ‘तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते.’ असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.