कर्जतमध्ये 55 पैकी 29 ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच
कर्जत: कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायती मध्ये 2025- 2030 या कालावधीत थेट सरपंच यांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत करण्यात आली.या सोडतीत आरक्षण निश्चित केले जात असताना अनेक ग्रामस्थांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी आक्षेप घेतल्याने गदारोळ सुरू झाला.त्यामुळे शेवटी पोलीस बंदोबस्त मागवून घेतल्यावर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.मात्र या आरक्षण सोडती विरुद्ध तब्बल 13 ग्रामस्थांनी तक्रारी लेखी स्वरूपात नोंद केल्या आहेत. दरम्यान,तालुक्यातील 55 ग्रामपंचायती पैकी तब्बल 29 ग्रामपंचायती मध्ये महिला सरपंच यांच्यासाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
कर्जत तालुक्यात 55 ग्रामपंचायती असून त्यात आगामी 2025 ते 2030 या कालावधीत थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम आयोजित केला होता.कर्जत येथील प्रशासकीय भवन मध्ये आयोजित केलेली आरक्षण सोडत तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाल्याने प्रचंड उष्णता असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ग्रामस्थ संतप्त झाले होते.तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी आरक्षण सोडत बाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईड लाईन यांची माहिती दिली आणि 2021 मध्ये झालेले आरक्षण सोडत ही बाद ठरविण्यात येत असून यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.त्यामुळे 2021 मध्ये थेट सरपंच यांचे आरक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झालेल्या नाहीत.त्या ठिकाणी काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती दिली.
त्यानंतर प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडती काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अनुसूचित जाती साठी दोन तर त्यानंतर अनुसूचित जमाती साठी 16,नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी 15 या सोडती निश्चित केल्या.तालुक्यातील 55 ग्रामपंचायत मधील 22 ग्रामपंचायती या सर्वसाधारण जाहीर करण्यात आल्या असून अनुसूचित जमाती एक, अनुसूचित जमाती आठ, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ आणि सर्वसाधारण 12 अशा 29 ग्रामपंचायत मधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली.त्या सोडतीसाठी गौरी दादा सो शेटे आणि विश्वराज दादासो शेटे या बालकांनी चिठ्ठ्या उचलल्या. अनुसूचित जमाती मध्ये शेलू,नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये ओलमन आणि सर्वसाधारण मधील तिवरे या तीन ग्रामपंचायत साठी केवळ चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
मात्र 2021 मध्ये काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द करण्यात आल्याने आमच्या ग्रामपंचायत मधील आरक्षण बदलले गेले आहे.त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्याबाबत आक्षेप घेण्यात सुरुवात केली.परिणामी कर्जत येथील थेट सरपंच आणि महिला आरक्षण सोडत ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.सुरुवातीला आरक्षण सोडत ठिकाणी एकमेव पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि त्यामुळे अधिकारी वर्गासमोर एकावेळी दहा पंधरा जण उभे राहून बोलू लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.त्यानंतर सर्वांना लेखी तक्रारी करण्याची सूचना प्रांत अधिकारी यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतर धोंडू राणे -पोशिर,मनीष राणे -पोशिर,उमेश म्हसे -वारे, संजय मिणमिने -अन्जप, भरत पाध्ये पाथरज, सचिन गायकवाड -आसल,केतन बोलोसे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,जगदीश ठाकरे -तिवरे,मनोहर पवार -खांडपे, संतोष पाटील -भालिवडी,मंगेश गायकर उमरोली,दशरथ राणे -पोशीर, हरीचंद्र निरगुडे -पोशिर यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.तर अनेक कार्यकर्त्यांनी तोंडी तक्रारी केल्या.गोंधळाची स्थिती कमी करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
कर्जत तालुक्यातील थेट सरपंच आरक्षण..
प्रवर्ग.. ग्रामपंचायत.. महिला आरक्षण
अनुसूचित जाती..2जागा पैकी मांडवणे तर कोंदिवडे -महिला
अनुसूचित जमाती.. 16 जागा पैकी महिला आरक्षण..8 आसल,शेलु,कळंब,अंजप, कशेले,बीड बुद्रुक,शिरसे,भालिवडी.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण.. बोरिवली,वैजनाथ,रजपे,पोशीर,वारे, साळोख तर्फे वरेडी, खांडपे,पाषाण.
नागरिकांचा मागास प्रवर्ग ..15 पैकी आठ महिला.. नांदगाव,ओलमन, पाथरज,वरई, हुमगाव,पळसदरी,दामत, गौरकामत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.. सात जिते,अंभेरपाडा,जामरंग,मोग्रज
,भिवपुरी,पाली,पिंपलोली
सर्वसाधारण ग्रामपंचायती 22 पैकी 12 महिला सर्वसाधारण..
हालिवली,किरवली,उमरोली, माणगाव तर्फे वरेडी, वाकस, मानिवली,तिवरे,वावलोली, सावेळे,कडाव,सावळे हेदवली, कोल्हारे.
सर्वसाधारण..
चिंचवली,उक्रुळ,नेरळ,ममदापूर,दाहिवली तर्फे वरेडी, वेणगाव,वदप,पोटल,खांडस.