राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...
नागपूर : शहरात सकाळी थंडी व दिवसा कडक उन्ह असे चित्र वातावरण असले तरी कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. त्यामुळे होळीपर्यंत शहराचा पारा 40 अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील हवामानात बदल होताना दिसत आहे. रात्री उशिरापासून सकाळी 8-9 वाजेपर्यंत थंड वातावरण असते. त्यामुळे दुचाकी चालकांना रात्रीच्या वेळी उबदार कपडे तर दिवसा सनकोटचा वापर करावा लागत आहे.
दिवसाचे कमाल तापमान सुमारे 38 अंश तर रात्री यात 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊन किमान तापमान 14 पर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे काही तासांमध्येच तापमानाच्या मोठ्या फरकाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दुपारी कूलर किंवा एसीचा वापर करावा लागत आहे तर रात्री साधा पंखा पुरेसा ठरत आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. परंतु, किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअस होते.
दिवसा चटके, सकाळी थंडावा
12 मार्चपासूनच शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, 14 मार्चपर्यंत शहराचे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पारा 40 च्या पुढेही जाऊ शकतो. किमान तापमानही 17 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस
शनिवारी, विदर्भातील कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान होते. अकोला हे सर्वात उष्ण होते. येथे 39.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीचे कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअस होते.
तापमानवाढीचा दिला होता इशारा
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे, गुरुवारपासून मुंबईसह आसपारच्या परिसरात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही स्थिती आठवडाभर टिकून राहू शकते. अरबी समुद्रात उच्च दाब असल्याने समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंद राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.