पुणे : पुण्यात मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांशी संबधित अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं, अनेक कारवाया देखील करण्यात आल्या. अशातच पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका हॉटेलवरील कारवाईसाठी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये चक्क पुण्यात दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिलाय. “एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..” अशा आशयाचे पत्र चक्क पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने संबंधित हॉटेल व्यवस्थापकाला देण्यात आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कल्याणी नगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत अनेकदा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनाकडून अनेकदा परवान्यातील अटी शर्तीचा भंग करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे कानाडळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.
दरम्यान या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने आग, चेंगराचेंगरी, गॅस गळती, अफवा यासारखी घटना घडून जीवितहानी होऊ शकते. तसेच सध्या अतिरेकी कारवायाबाबत अलर्ट आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हॉटेलचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये असे या नोटीसीद्वारे विचारले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने ही कारणे दाखवा नोटीस असल्याने एकच खळबळ उडाली आहे.