राज्यातील अनेक भागांत आयकर विभागाचे छापे; कोल्हापुरात तर...
राज्यातील अनेक भागांत आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यात कोल्हापूरस्थित उद्योजकाच्या गोव्यातील स्टील उद्योग समूहाच्या तीन राज्यात छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात आयकर विभागाने अनुप बन्सल नामक उद्योगपतीच्या घरावरही छापेमारी केली आहे.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील स्टील उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर तसेच कोल्हापुरातील निवासस्थानाचा सुद्धा समावेश आहे. गोव्यात या उद्योजकाचे मुख्य युनिट असून, ते कोल्हापूरचे आहेत. गोव्यात आयकर विभागाने कारवाई केल्यानंतर कोल्हापूरमधील स्थानिक आयकर विभागाकडून उद्योजकाच्या आलिशान घराची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईनंतर उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळपासून सुरु झालेली कारवाई गुरुवारी (दि.९) सकाळपर्यंत सुरुच होती. पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : 10 दिवस, 3520000000 रुपये, 36 मशीन्स…, ट्रकमध्ये भरावे लागल्या नोटा; भारतातील सर्वात मोठा आयकर विभागाचा छापा
स्टील उद्योग कंपनीच्या निगडीत संचालकांवरही छापेमारी करण्यात आली आहे. गोव्यामधील स्टील उद्योग समूहाच्या संचालकांच्या गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील कारखाना, निवासस्थान व कार्यालय आदी ठिकाणांवर गोव्यामधील आयकर विभागाने छापेमारी केली. यामध्ये महाराष्ट्रात कोल्हापुरात पाच ठिकाणांवर, उत्तर प्रदेशमध्ये सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाकडून उद्योगपतीच्या घरामध्ये अजूनही झाडाझडती सुरूच आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील या बड्या उद्योजकाचा कागल एमआयडीसीमध्ये स्टील उत्पादनाचा कारखाना आहे. या कारखान्याकडून गोवा महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशात स्टीलचा पुरवठा केला जातो.
गोव्यातही आयकर विभागाकडून कारवाई
गोव्यातील आयकर विभागाने बुधवारपासून तिन्ही राज्यातील संबंधित कंपनीचे कारखाने व संचालकांच्या निवासस्थानी छापेमारी करत झाडाझडती केली. आयकर विभागाकडून संबंधित उद्योग समूहाच्या गेल्या सहा वर्षातील विविध खात्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. उद्योग समूहाने घर, जमीन, शेअर्स तसेच सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे समजते. त्याचबरोबर उद्योग समूहाची विविध कागदपत्रे सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत.
दसऱ्याचा खरेदी केली आलिशान कार
या उद्योजकाने दसऱ्यालाच आलिशान कार खरेदी केली आहे. या कारची किंमत दीड ते पावणे दोन कोटींच्या घरात असल्याचे समजते. या गाडीला अजूनही नंबर मिळालेला नाही. त्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. पसंती नंबर हवा असल्याने अजूनही गाडीला नंबर नसल्याचे कळते.