वडगाव मावळमधील गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी महिला अडकल्याने बचावकार्य करत महिलेचा जीव वाचवला. (फोटो सौजन्य - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर धरणे देखील भरली असून नदी नाल्यांना अक्षरशः पूर आला आहे. दरम्यान, मावळमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. यामध्ये एक महिला नदीकाठी अडकली होती. अथक प्रयत्नानंतर तिला वाचवण्यात यश आले आहे.
मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत १९ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गोंडुब्रे गावाजवळील नदीकाठी एक महिला अडकून पडली होती. तिच्या जीवघेण्या अवस्थेत दिलेल्या मदतीच्या आर्त हाकेला तळेगाव दाभाडे पोलीस व वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रतिसाद मिळाला. अखेर त्या महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मावळच्या ग्रामस्थांनी “नदीकाठी कोणी तरी मदतीसाठी आवाज देत आहे” अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी प्रशांत सोनवणे यांनी तत्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. गराडे यांनी लगेचच संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीला सतर्क केले.
यानंतर विनय सावंत, कमलेश राक्षे यांसारखे स्वयंसेवक तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जोरदार पावसातही जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले. नदीच्या प्रवाहात झाडाला लटकून जीव वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यात्या महिलेपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे मावळमधील पोलीस यंत्रणा आणि वन्यजीव रक्षक यांचे आभार मानले जात असून कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशान्वये नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करता वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच प्रभाग संख्या निश्चित करून आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील अशी माहिती वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रवीण निकम यांनी दिली आहे. वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी शासनाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आज प्रारूप प्रभाग रचनेची प्रसिद्धी करण्यात आली असून, हरकती व सूचना असल्यास दाखल कराव्यात,असे आवाहन करण्यात आले आहे.