'तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात'; शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरात आंदोलन
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधात शुक्रवारी (दि.१५) कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच, असा संदेश सरकारला देण्यासाठी ‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’ हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील यांनी केले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ नको. ठेकेदार आणि राज्यकर्त्यांची खिसे भरणारा हा शक्तिपीठ हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे, यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगण्यात आले. ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग आता १ लाख ६ हजार कोटींवर गेला आहे. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. या बदलात राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत, त्या ठिकाणी रस्ते करा. शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी यावेळी मांडली. १२ जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवशी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाने शक्तीपीठ महामार्ग विरोधाला पुन्हा एकदा धार आली आहे. भुदरगड आणि कागल तालुक्यामध्ये विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन केले. तर हातकंणगले आणि शिरोळ तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केले. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सुद्धा शक्तीपीठविरोधी ठराव तसेच गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
सतेज पाटील यांनी गारगोटी, आकुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतात शक्तिपीठ विरोधात झेंडा झळकवून आदोलन केले. दुसऱ्या टप्प्यात एकोंडी (ता. कागल) येथील शिवारामध्ये झेंडा झळकवून सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा गगनभेदी घोषणा दिल्या. दुसरीकडे, ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा ऊभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशी मागणी करत साजणी (ता. हातकंणगले) व निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील शिवारात स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले.
रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गामुळे पुढील जवळपास ९० वर्षाहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे. मुठभर उद्योगपतींना व त्यांच्या व्यवसाय वृध्दीला डोळ्यांसमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जात आहे. देशातील १५० कोटी जनतेला दोन वेळ पुरेल एवढे अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर वरवंटा फिरविला जात आहे, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.