'त्या' सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ (File Photo : Court)
बीड : एका सरकारी वकिलाने वडवणी न्यायालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या प्रकरणाला बीड जिल्ह्यात वेगळी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात थेट न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी साताऱ्यात एका न्यायाधीशावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता वडवणीतील प्रकरणाने न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दोन दिवसांपूर्वी वडवणी कोर्टात सरकारी वकील विनायक चंदेल यांनी सत्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पोलिसांना त्यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली. या नोटच्या आधारे आणि चंदेल यांचा मुलगा विश्वजीत याच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात न्यायाधीश शेख आणि एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायाधीश शेख आणि संबंधित कर्मचाऱ्याकडून चंदेल यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
न्यायाधीशाचा राजीनामा
या घटनेनंतर न्यायाधीश रफिक शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आरोपी न्यायाधीश व संबंधित कर्मचाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
अधिक तपासानंतर सत्य येणार समोर
एका न्यायाधीशावरच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची ही घटना अभूतपूर्व मानली जात आहे. यामुळे न्यायालयीन वर्तुळात आणि समाजात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच खरे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरकारी वकिलाने कोर्टातच जीवन संपवले
काही दिवसांपूर्वीच, बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील न्यायालयात सत्काराच्या शालनेच गळफास घेत सरकारी वकिलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता याप्रकरणी आत्महत्या केलेल्या सरकारी वकील व्ही.एल. चंदेल यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव होता, त्यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी आम्हाला दाखवली नाही. त्या चिठ्ठीत नेमका काय उल्लेख आहे, तो आम्हाला माहिती नाही. परंतु, जे कुणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंदेल कुटुंबीयांनी केली आहे.