मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- महासंवाद)
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट–ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील सर्व घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील शेवटच्या घटकाच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. जनतेप्रती प्रामाणिक राहून जनतेची सेवा करण्याचे कार्य आपल्या हातून होणार आहे. या संधीचे आपण सोने करावे, असे आवाहनही श्री. शिरसाट यांनी यावेळी केले.
देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले. दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच ‘हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएल, व्हिएसटीएफ व छत्रपती संभाजी नगर महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.