फोटो सौजन्य -iStock
पनवेल ग्रामीण एमजेपीची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने मंगळवार, २५ जून रोजी संध्याकाळपासून पनवेलमधील अनेक भागातील पाणीपुरवठा खंडीत झाला होता. जलवाहिनी फुटल्याने पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली आणि करंजाडे वसाहतींचा पाणी पुरवठा अचानक खंडित झाला होता. आज २६ जून रोजी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात एमजेपीला यश आले आहे. मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळित झाला नाही. गुरुवार २७ जून रोजी सकाळपर्यंत सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जलवाहिनी फुटल्याने मंगळवार, २५ जून रोजी संध्याकाळपासून पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली आणि करंजाडे वसाहतींचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. अचानक पाणीपुरवाठ खंडीत झाल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकर पाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पनवेल पालिका हद्दीतील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली वसाहत आणि करंजाडे वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनी जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा जलवाहिनी फुटून नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिनी बदलण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांची ही मागणी मान्य करत प्रशासनाने जुन्या आणि जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी प्रफुल देवरे यांनी सांगितलं की, पनवेल ग्रामीण एमजेपी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्या नंतर पंपीग द्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु केले जाते. मात्र या सर्व प्रक्रियेला ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही भागात इमारतींना आज सायंकाळ पर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल. तर ज्या भागात उंच टाक्यांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो त्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी उद्या सकाळ पर्यत वाट पाहावी लागणार आहे.