मुंबई : दापोली रिसॉर्ट, दापोली रिसॉर्टच्या जमीनीचे आर्थिक व्यवहाराप्रकरणी रिसॉर्टच्या विद्यमान मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्यात आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. रिसॉर्ट प्रकरणी दाखल याचिका खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ही याचिका दाखल करून कदम न्यायालयाचा वेळ वाया घालवत असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे.
सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०१७ मध्ये माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्याकडून बंगला बांधण्यासाठी भूखंड खरेदी केला होता. सप्टेंबर, २०१७ मध्ये, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना (एमआरटीपी) कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांनी जमिनीचे बिगर-कृषी प्रयोजनात रूपांतर करण्यास त्यांना परवानगी दिली, त्यानंतर डिसेंबर, २०२० मध्ये विक्री करार अंमलात आणला गेला आणि जमिनीच्या नावात बदल करण्यात आल्याच्या महसूल नोंदी असताना अनिल परब हे माजी मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती असल्यामुळे तसेच या जागेचेही ते माजी मूळ मालक असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली आपल्याला नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. असा दावा कदम यांनी याचिकेत केला आहे.
त्यातच याचिकेत आता भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी ह्स्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार, विभास साठे यांना एक कोटी रुपये देऊन मुरुड गावातील दापोलीतील रिसॉर्टची जमीन विकत घेतले असल्याचे अनिल परब यांनी निवडणुकीच्या मालमत्तेमध्ये लिहिले होते. तसेच परब यांनी रिसॉर्टच्या बांधकामासाठी ३ फेज मीटर वीज जोडणी मार्च २०२० रोजी घेतील होती, अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. त्या मीटरच्या वीज पुरवठ्यानुसार मार्च २०२० ते मार्च २०२१ मार्च रिसॉर्टचे बांधकाम जलदगतीने कऱण्यात आल्याचेही माहितीतून स्पष्ट होत आहे. या वर्षाभरातील वीजेची देयकेही अनिल परब यांच्या नावावर येत होती आणि परब स्वतःच्या बॅंक खात्यातून देयके भरत असल्याचे म्हटले आहे. मार्च २०२१ नंतर वीज जोडणी सदानंद कदम यांच्या नावे हस्त्तांतरित कऱण्यात आले असल्याचेही महावितरणाने दिलेल्या माहितीत म्हटले असल्याचे सोमय्यांनी अर्जात म्हटले आहे.
[read_also content=”मुंबईतील झोपडपट्टीवासियांच्या रखडलेल्या योजनांना गती देणार : मंगलप्रभात लोढा https://www.navarashtra.com/maharashtra/will-speed-up-the-stalled-schemes-of-slum-dwellers-in-mumbai-mangalprabhat-lodha-nrdm-329367.html”]
जून २०१९ मध्ये परबांनीच स्वतः स्वाक्षरीने मुरुड ग्रामपंचायत, दापोलीचे सरपंच यांच्या नावाने पत्र लिहून विभास साठेंकडून दापोली साई रिसॉर्टची जमीन घेतली आहे. तसेच त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम अनिल परबच्या नावे करण्यात यावे असा अर्ज केला होता. त्यानंतर रिसॉर्टची वर्ष २०१९-२० घरपट्टी ४६,८०६ परब यांनी भरली असल्याच्या पावत्या आपल्याकडे असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. तर २०१७ रोजी साठेंनी परब यांना जागा विकली असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीच्या आधारे रिसॉर्टची जमीन विकत घेणे, ताबा घेणे, बांधकाम, बिनशेती परवानगी अर्ज इत्यादी अनिल परब यांच्याद्वारेच करण्यात आला आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा दावा सोमय्यांनी केला आहे.