online betting
पुणे : कोंढव्यातील साईबाबा नगरमधील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत (Dharmashree Signature Society) बंद फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग (IPL Match Betting) घेणार्या सट्टेबाजांचा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. छापा कारवाई करून तीन सट्टेबाजांच्या मुसक्या अवळल्या असून, त्यांच्याकडून 5 मोबाईलसह एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. सट्टेबाजांच्या रॅकेटमध्ये (IPL Betting Racket) पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील प्रसिद्ध पबच्या मालकासह मुंबई, मध्यप्रदेश आणि दुबईतील बुक्कींचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
वसीम हनीफ शेख (वय 39), इक्रामा मकसुद मुल्ला (वय २६, घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांसह कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध पबचा मालक जितेश मेहता (रा.पुणे) आणि मध्यप्रदेशातील बडा बुक्की अक्षय तिवारी (रा. इंदौर, मध्यप्रदेश) यांच्याविरूध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक शंकर शिवाजी संपते यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार सुधीर इंगळे, शंकर संपते, प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, संग्राम शिनगारे, चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे आणि त्यांच्या पथकाने केली.
गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सुधीर इंगळे आणि शंकर संपते यांना काही बुक्की हे कोंढव्यातील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीतील बंद फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी छापा कारवाई केली. त्यावेळी या तिघांना पकडण्यात आले. तपासात आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्स विरूध्द चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचवर ऑनलाइनने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीव्दारे सट्टा खेळत आणि खेळविताना आढळून आले. पोलिसांनी 5 मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला आहे.
पोलिसांनी मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी सुरू केली. त्यावेळी रॅकेटमध्ये कोरेगाव पार्कमधील प्रसिध्द पबचा मालक जितेश मेहता व मध्यप्रदेशातील बडा बुक्की अक्षय तिवारी याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या बुक्कींचे मोठे कनेक्शन देखील असल्याची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेकडून याचा सखोल तपास केला जात आहे.