बारामती: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली. यात सुप्रिया सुळे बहुमताने निवडूनही आल्या. पण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना लढवणे ही आपली चूक होती, अशी कबूलीही अजित पवारांनी दिली. यावरून राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वत्र चर्चा सुरू असताना आता त्यांनी पुन्हा बारामतीच्या राजकारणासंदर्भात आणखी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
खरंतर बारामती मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्लाच मानला जातो. पण आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार स्वत: लढण्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार यांना बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर भाष्य केले.
हेदेखील वाचा: विजयवाड्याच्या दुर्गम्मा मंदिरात पैशांचा पाऊस; 18 दिवसांत करोडो रुपयांची कमाई
अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत बारामतीतून कोणाला लढवणार असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, आपल्याकडे लोकशाही आहे. मी बारामतीतून सात- आठवेळा निवडणूक लढवली आहे. जय पवार यांच्यासंदर्भात जर जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेईल. जनता, कार्यकर्ते आणि संसदीय मंडळ जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.’ असे सांगत त्यांनी एकप्रकारे बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेच संकेत दिले आहेत.
पण अजित पवार बारामतीतून लढणार नसतील तर ते कुठून लढणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. याबाबतही मोठी अपडेट समोर येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार कर्जज-जामखेड मतदार संघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर अजित पवार या मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिल तर हा आमदार रोहित पवारांसाठी मोठा शह ठरू शकतो.
हेदेखील वाचा: ISRO ने श्रीहरिकोटा येथून SSLV मिशनचे शेवटचे रॉकेट केले लाँच; जाणून घ्या मोठे अपडेट्स
2019 मध्ये भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार इथून निवडून आले होते. पण यंदा अजितदादा कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे. विशेष म्हणजे खुद्द रोहित पवार यांच्याच ट्विटमुळे अजित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.