नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. गेल्यावर्षीपासून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मोठा लढा उभा केला आहे. तर सध्या जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण रॅली नाशिकमध्ये होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे, मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असून, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद हा सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. तसेच सगेसोयरे मागणीची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते आंदोलन करत आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच आज जरांगे पाटील यांची नाशिकमध्ये रॅली होणार असल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छगन भुजबळ यांच्या ‘भुजबळ फार्म’ निवासस्थानी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. तसेच रॅली होत असल्याने वाहतुकीतदेखील बदल करण्यात आला आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ व मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य नसल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार असे जरांगे पाटील म्हणत आहेत. मनोज जरांगे पाटील हे सातत्याने सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करत आहेत. खास करून उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी टीकेची झोड उठविली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी सरकारवर ते प्रहार करत आहेत. तसेच २९ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या संदर्भात देखील निर्णय घेऊन आपले उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे ठरवले जाणार आहे.