श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले; जयंत पाटलांची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
पुणे : एखाद्या आमदाराने गरिबासाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होते. मात्र हे आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला आता घरी बसवा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगावशेरीचे विद्यमान आमदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची धानोरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील यांनी सुनील टिंगरे यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.
या जाहीर सभेत जयंत पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्व, जनसंपर्क, आणि लोकांसाठी केलेल्या कामाचे त्यांनी जोरदार कौतुक केले. पठारे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आणि वडगाव शेरीचे नाव बदनाम करणाऱ्या आमदाराला घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी या सभेत मतदारांना केले.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्याकडून काय अपेक्षा असतात. काही वेळापूर्वीच आपण पोर्शे अपघात प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. भरधाव वेगातील पोर्शे गाडी दोघांच्या अंगावर घालण्यात आली. यात दोघांचा मृत्यू झाला. अशावेळी इथले आमदार त्या दोघांना घेऊन रुग्णालयात गेले असते, आणि ते जिवंत रहावे यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित बापूसाहेब पठारेंना निवडणुकीला उभे राहण्याची संधी मिळाली नसती. मात्र हे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गेले. या प्रकरणातील आरोपीला पिझ्झा खायला दिला. अख्खी रात्र आरोपी कारचालकासोबत काढली. एखाद्या आमदाराने गरिबांसाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होते.. पण हे आमदार श्रीमंत मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखे रात्रपाळी करत बसले. अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदाराला घरी पाठवलं याच्यातच तुमचे हित आहे. बापूसाहेब पठारे यांच्यासारखा नम्र प्रामाणिक आणि मतदारसंघाचा २४ तास विचार करणारा, विकासाचे पुढचे पाऊल टाकणारा आमदार वडगाव शेरीला पाहिजे. निवडून दिल्यास बापूसाहेब पठारे तुमच्या पाठीमागे उभे राहतील.. त्यांना शरद पवारांचा आशीर्वाद आहे. असे म्हणत जयंत पाटील यांनी बापूसाहेब पठारे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
हे सुद्धा वाचा : राजकारण्यांनी टीव्ही मालिका देखील सोडल्या नाहीत; शिंदे गटाविरोधात काँग्रेसची तक्रार
कल्याणीनगर येथे मे महिन्यात झालेल्या ‘पोर्श कार’ अपघात प्रकरणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर विश्वास दाखवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वडगाव शेरीमधून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार बापू पठारे यांना आमदार टिंगरे यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात होणारी लढत माजी विरुद्ध विद्यमान आमदार अशी होणार आहे.