Jitendra Awhad on Devendra Fadnavis
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्द्यावरुन राज्याचे राजकारण रंगले आहे. यापूर्वी मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी अनावरण केलेल्या हा पुतळा कोसळल्यामुळे महायुतीला निशाण्यावर धरण्यात आले. यानंतर आता भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे कॉंग्रेसने सांगितले असल्याचे म्हणत नवीन वादाला तोंड फोडले. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांच्या विधानाला पविरोध दर्शवत औरंगजेबाच्या मुलाच्या पुस्तकामध्ये देखील सुरत लूटीचा उल्लेख असल्याचे नमूद केले आहे.
आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं
माध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. राजकोट पुतळा प्रकरणातील शिल्पकार आरोपी जयदीप आपटे अजूनही फरार आहे. यावरुन टीका करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी तो आरोपी सापडणार पण नाही, असे विधान केले. आमदार आव्हाड म्हणाले, ‘आपटेला पकडणं मुश्किल ही नाही नामुंमकीन हैं’ “कुठलाही अनुभव नसलेल्या जयदीपला कोणी हे काम दिलं ते लोक देखील तेवढीच दोषी आहेत” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
औरंगजेबाला मारलं नव्हतं, त्याला हार्ट अटॅक आला
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतची लूट केली हा इतिहास कॉंग्रेसने शिकवला असल्याचे म्हटले. यावरुन टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मराठ्यांच्या इतिहासाच विकृतीकरण करणं, हा अनेक वर्ष मनुवाद्यांचा प्रयत्न होता. औरंगजेबाच्या पुत्राने लिहिलेल्या पुस्तकात देखील सुरत लुटीचा उल्लेख आहे. मुघलांना कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सुरत हे पैसे देणारं अभिनव केंद्र होतं, म्हणून सुरतेची लूट केली होती. काही वर्षांनी तुम्ही सांगाल औरंगजेबाला मारलं नव्हतं, त्याला हार्ट अटॅक आला होता. शिवाजी महाराज यांना लहान करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना बदनाम करु नका,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
3-4 हजार कोटींमध्ये सरकार पाडतील
तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेवर मत मांडताना आमदार आव्हाड म्हणाले, “न्यायालयाकडून प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहेत. सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटतय की सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींन याची कल्पना आहे. पैशाने सरकार पाडणे हे पुढच्या लोकशाहीसाठी घातक आहे. राष्ट्रपती शासन लावले जाईल की नाही माहीत नाही, पण संविधानाच्या कलम 10 चा अपमान झाला आहे. हे सगळं आपण रोखलं नाही तर 3-4 हजार कोटींमध्ये पुढची सरकार पाडली जातील. निवडणुका पुढे गेल्या, त्याचा अजूनही लोकांच्या मनात राग आहे. तसेच आमची जागावाटपाची चर्चा सुरु आहे,” असे मत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.