
सातारा : महाराष्ट्रातील सरकार असो अथवा दिल्लीतील मराठ्यांना न्याय हा द्यावाच लागेल. कायद्याच्या निकषावर टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात एक मराठा समाजाचा घटक म्हणून मी माझी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ मांडेन, असे स्पष्ट आश्वासन आमदार भोसले यांनी मराठा आंदोलकांना दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या माध्यमातून सहाव्या िदवशीही आंदाेलन सुरूच हाेते. आंदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक अडविली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी आंदोलन स्थळाला भेट देऊन स्वतः आंदोलक म्हणून आपली भूमिका मांडली.
सुकाणू समितीचे पदाधिकारी शरद काटकर, हरीश पाटणे, सुनील काटकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मोर्चात सहभाग नोंदवून आरक्षणाच्या लढ्याची धार कायम ठेवली.
आमदार भोसले म्हणाले, मी येथे आमदार म्हणून आलेलो नाही. मराठा समाजाचा एक घटक म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देणे आणि ही जनभावना राज्य शासनापर्यंत पोहोचवणे, हे मी माझे कर्तव्य समजतो आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी मराठा समाजापेक्षा मोठा नाही. समाजातील ताकदीमुळेच आम्ही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. हे आंदोलन समन्वयकांच्या हाती राहिले नाही. ते जनतेच्या हाती गेले आहे.
आमदारकीपेक्षा प्रेम महत्वाचे
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आमच्या घराण्यावर आपल्या सर्वांचे प्रेम आहे. मी असो अथवा उदयनराजे असो. शिवछत्रपतींच्या घराण्यावर तुम्ही सर्वजण प्रेम करणारे आहात त्यामुळे आमदारकी असो व खासदारकी यापेक्षा तुमचे प्रेम महत्त्वाचे आहे. पदे येतात जातात. या कायमच्या गोष्टी नाहीत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावरील तुमचे प्रेम, श्रद्धा कायम राहावी, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार भोसले यांनी मांडली
परळीतून हजारो नागरिक दाखल
एक दिवस समाजासाठी या अभिनव उपक्रमाचे सातारा शहर परिसरात चांगले स्वागत झाले आहे. दररोज सातारा शहरालगतच्या सातारा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी परळी खोऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली येथील सुमारे ५०० नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढून परळी ते सातारा असा प्रवास केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले तात्या सावंत, प्रकाश भोसले व महिला आंदोलकांना उत्स्फूर्त पाठिंबा देण्यात आला.