कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नेटकरी आणि मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सोशल मिडियावर महापालिका प्रशासनास लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक उपक्रम करत आहेत. चक्क चांद्रयान ३ मोहिमेशी कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्ड्यांची तुलना केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरीत चांद्रयान मोहिमेद्वारे चंद्रावर कशाला जायले पाहिजे. खड्डे बघायचे असल्यास मुंबई गोवा महामार्गावर यायला हवे. तसेच या मार्गाच्या कामाकरीता गेल्या १५ वर्षात १५ हजार कोटी रुपये खर्च झाले. तरी रस्ता पूर्ण झाला नाही. चांद्रयान मोहिमेला झालेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च या महामार्गावर झाला असल्याची टिका केली. त्यामुळे ठाकरे यांच्या बोलण्यात खरोखरच तथ्य आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यावरील खड्डयांच्या मुद्यानंतर आत्ता कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रकरणावरही लक्ष्य केले जात आहे. केदार पाध्ये यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी डोंबिवलीतील रस्त्यावर पडलेले खड्डे हे ऐतिहास ठेवा आहे. ते जपून ठेवा असा उपरोधिक सल्ला प्रशासनाला दिला आहे.
मनसेचे पदाधिकारी राहूल कामत यांनी डोंबिवली आणि चंद्रावरील खड्डे पाहून माझ्या दुचाकीचे नाव विक्रम लँडर ठेवावं अशी खोचक टिका केली आहे. चांद्रयान चाचणीच्या वेळी डोंबिवलीतील खड्डा दाखवून त्यावर यान उतरत असल्याचे चित्रच तेजस शिंदे यांनी पोस्ट केले आहे. तर विवेक पाठक यांनी कोकणात जायला न मिळालेल्या लोकांना सुवर्ण संधी…जोशी हायस्कूल ते गंजूनाथ येथून कारने प्रवास करा आणि मुंबई गोवा रस्त्याचा फिल घ्या अशी टिप्पणी करुन प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे.