कल्याण : घरात महिला एकटी झोपली असता. घराच्या खिडकीतून हल्लेखोर आला. त्याने महिलेच्या गळ्यावर आणि हातावर सपासप वार केले आणि पळून गेला. जखमी महिला सोनम पाल हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र हा हल्ला कशासाठी करण्यात आला याची माहिती आरोपी समोर येताच कळेल. खडकपाडा पोलिसांना आरोपीसंदर्भात काही माहिती हाती लागली आहे. त्याचा खुलासा काही तासाच होणे अपेक्षित आहे. या हल्ला प्रकरणाचा तपास आत्ता खडकपाडा पोलिसांनी सुरु केला आहे. कल्याण पश्चिमेतील कोलीवली रोड परिसरात ही घटना घडली आहे.
कल्याण पश्चिमेतील कोलीवली रोड परिसरात वैशाली भोईर चाळ आहे. या चाळित नितेश पाल हा त्यांची पत्नी सोनम सोबत राहतो. नितेश हा जवळच्या एका बेकरीत कामाला आहे. रविवारी रात्री तो बेकरीत कामात असताना पत्नी सोनम घरात एकटीच होती. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोनम घरात एकटी असताना घराच्या खिडकीतून एक इसम घरात आला. त्याने साेनमच्या गळ्यावर आणि हातावर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात सोनम गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडताच खडकपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर पसार झाला.
डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील, शरद जिने आणि अनिल गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सोनमवर कोणी आणि कशाच्या उद्देशाने हल्ला केला आहे याची माहिती समोर आली नाही. काही दिवसापूर्वीच सोनम ही तिच्या मूळ गावातून पतीसोबत कल्याणमध्ये राहण्यास आली आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांना आरोपीसंदर्भात काही सुगावा लागल्याची माहिती समोर आली आहे. काही तासात या प्रकरणाचा पोलीस खुलासा करणार असल्याचे सांगितले जात आहे.