sharp shooters
अमजद खान, कल्याण: पंजाबमधील (Punjab) तीन कुख्यात शार्प शूटर्सना कल्याणमधील (Kalyan) मोहने परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स (Anti Gangster Task Force), मुंबई एटीएस (Mumbai ATS) आणि खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) संयुक्त कारवाई करत या तिघांना ताब्यात घेतले आहे. शिवम सिंग,गुरुमुख सिंग,अमनदिप कुमार हे तिघे शार्प शूटर पंजाबमधील मख्खन सिंग यांची हत्या करून कल्याणजवळील मोहने परिसरात लपून बसले होते. हे तिघे पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य आहेत.
[read_also content=”रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’चा ‘सैराट’ वेग, रविवारी पावणे सहा कोटींची कमाई करुन मोडला रेकॉर्ड, आत्तापर्यंत 33 कोटींचा गल्ला https://www.navarashtra.com/movies/ritesh-and-genelia-deshmukhs-ved-movie-broke-record-of-sairat-of-single-day-collection-nrsr-360334.html”]
कल्याण पश्चिम येथील मोहने यादव नगर परिसरातील एका इमारतीत पंजाबमधील नवा शहर येथील फरार कुख्यात गुंड असल्याची माहिती पंजाब पोलिसांकडे होती. गेल्या दोन दिवसांपासून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अधिकारी आणि कर्मचारी या परिसरात तिघांवर नजर ठेवून होते. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या टास्क फोर्सने, मुंबई एटीएस व खडकपाडा पोलिसांच्या मदतीने या इमारतीत लपून बसलेल्या तीन शार्प शूटर्सना ताब्यात घेतले. यासाठी शंभरहून जास्त पोलीस कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते. या कारवाईत खडकपाडा पोलिसांची भूमिका महत्त्वाची होती. हे तिघे पंजाबमध्ये झालेल्या मख्खन सिंग हत्याकांडात फरार होते. या हत्याकांडात पंजाब पोलिसांनी मनदीप सिंग या आरोपीला अटक केली होती. या आरोपींच्या चौकशी दरम्यान शिवम सिंग,गुरुमुख सिंग , अमनदिप कुमार या तिघांची नावे सांगितली. या तिघांना कल्याण न्यायालयात हजर करून घेण्यात येईल आणि ट्रानझिक रिमांड घेत पंजाब पोलिस या तिघांना घेऊन पंजाबला रवाना होणार आहेत. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता आहे.