कल्याण :- राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लवकर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचार केला जात आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या नेत्यांच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. महायुतीकडून कपिल मोरेश्वर पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून शुक्रवारी सकाळी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. या भव्य रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, महायुतीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या वतीने केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची सर्वात आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचा फायदा घेत कपिल पाटील यांनी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला. भिवंडी शहराबरोबरच भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, बदलापूर, मुरबाड व शहापूर तालुका पिंजून काढला असून, शहरांमधील सोसायट्या व गावांमध्ये थेट नागरिकांबरोबर संवाद साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याची व १० वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. त्याला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांबरोबरच विविध सामाजिक संस्था व प्रतिष्ठीत व्यक्ती आणि समाजसेवकांचीही भेट घेऊन पाठिंबा मिळवला.भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपाबरोबरच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले), रासप, कुणबी सेना आदी पक्षांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात हिरीरीने सहभागी झाले आहेत.
कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावांमध्ये शहरांतील विविध भागात तयारी केली जात असून, हजारो कार्यकर्ते भिवंडीला पोचणार आहेत. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शुक्रवारी सकाळी १० वाजता भव्य रॅलीला सुरूवात होईल. त्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, रॅलीद्वारे महायुतीच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून वंजारपट्टी नाकामार्गे उपविभागीय कार्यालयापर्यंत रॅली पोचल्यानंतर, कपिल पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाईल. या रॅलीत महायुतीचे आमदार किसन कथोरे, महेश चौघुले, दौलत दरोडा, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, डी. के. म्हात्रे,रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांचाही सहभाग असेल.