कर्जत /संतोष पेरणे : तालुक्यात असलेल्या वीज ग्राहकांचे वीज मीटरचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं आहे. मीटर तपासण्याची यंत्रणा कर्जत महावितरण कार्यालयात उपलब्ध नाही. त्यामुळे वीज मीटर तालुक्यातील ग्राहकांना पनवेलला जावं लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत येथे महावितरणचे कार्यालयात येणारे वीज ग्राहक यांना वीज समस्यांनी त्रस्त केले आहे. अनेक वीज ग्राहकांचे वीज मीटर खराब असल्याने ते प्रत्येक ग्राहक आपले वीज मीटर यांची तपासणी करून घेण्यासाठी कर्जत कार्यालयात पोहचतात. मात्र कर्जत कार्यालयात वीज मीटर तपासणी करण्यासाठी असलेले मीटर नादुरुस्त आहेत. त्याचा परिणाम वीज मीटर तपासणी करण्यासाठी पनवेल येथे पाठवले जात आहे. गेली अनेक दिवस होऊन देखील मीटर टेस्टिंग नसल्यामुळे ग्राहकांना हा पनवेल फेरा त्रासदायक ठरत आहे.
मीटर तपासले जात नसल्यामुळे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत,त्यात घरगुती मीटर साठी पाचशे ते सहाशे युनिट पडत आहेत. जिथे घरगुती वापरासाठी 80 ते 100 पडतात तिथे आता पाचशे ते सहाशे युनिट पडत आहेत आणि असे मीटर चेक करण्यासाठी ग्राहक घेऊन जात असतात. परंतु तेथे मीटर चेक करण्यासाठी मशीन खराब असल्याचे सांगितले जाते व त्या ग्राहकांना मीटर चेक करण्यासाठी पनवेल येथे पाठवले जात आहे. चई, खांडस, पाषाणे, पिंपळोली, सालपे, अश्या खेड्यातून पूर्ण दिवस प्रवास करून येणाऱ्या ग्राहकांना मीटर टेस्टिंग साठी पनवेल येथे पाठवले जात असल्याचे निदर्शनात आले आहे.
वीज ग्राहकांना या होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? हा होणारा नाहक त्रास कधी बंद होणार? यावर महावितरण कडून सांगितले आहे की, मीटर चेक करण्यासाठी लागणारे मशीन याची व्हॅलेडिटी संपली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील आम्हाला मीटर चेक करण्याची मशीन मिळत नाही अशी तक्रार देखील वरिष्ठांकडे केली आहे.त्यामुळे पनवेल येथे मीटर चेक करण्यासाठी ग्राहकांना पाठवले जात आहेत.