
पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; 'या' तारखेला होणार अधिकृत घोषणा
यावेळी महापाैर पदासाठी महिला (सर्वसाधरण) हे आरक्षण पडले आहे. यामुळे ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते आदींची नावे चर्चेत आहेत. टिळेकर या विधान परीषद सदस्य याेगेश टिळेकर यांच्या आई आहेत. तर देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या वहीनी आहेत. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून नागपुरे यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते. तापकीर यापुर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हाेत्या, परंतु त्यांना संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्या देखील या पदाच्या दावेदार ठरू शकतात.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणूक सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या पदांसाठी ३ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या महापाैर पदी काेण विराजमान हाेणार हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट हाेणार आहे. सत्ताधारी भाजपकडून जाे उमेदवार दिला जाईल, त्याचा विजय निश्चित आहे. तर भाजप हे उपमहापाैर पद आरपीआयच्या पारड्यात घालणार का ? पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी या पदाचा तडजाेडीसाठी उपयाेग करून घेणार हे लवकरच स्पष्ट हाेईल.
स्थायी समितीसाठी १६ सदस्यही निवडले जाणार
पुणे महापालिका निवडणूक नुकतेच पार पडली. १६५ सदस्य असलेल्या महापालिकेत सर्वाधिक ११९ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. या सभेच्या पत्रिकेवरच स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती, तसेच इतर विषय समित्यांवर १३ सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय देखील घेण्यात आला आहे. दरम्यान, यंदा महापौर पद महिलांसाठी राखीव असल्याने उपमहापौर पदी शक्यतो पुरुष सदस्याला संधी दिली जाण्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे.