पुणे : मते मिळविण्यासंदर्भात भाजपच्या नेत्यांनी बसविलेले गणित कसबा विधानसभा (Kasba Bypoll) मतदारसंघातील मतदारांनी चुकविले. पोटनिवडणुकीतील दुरंगी लढतीत शहराच्या पश्चिम भागातील प्रभागात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची मते कमी करायची हा त्यांचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. परंतु, हक्काच्या मतदारांनीच धंगेकरांना साथ दिल्याने गणित बिघडले.
निवडणूक जिंकण्यासाठी पडद्यामागील हालचाली हा देखील रणनितीचा भाग असतो. यामध्ये मतांच्या आकडेवारीचा अभ्यास, अनुकूल भागात जास्त मतदान करून घेणे, त्यासाठी बुथ यंत्रणा उभी करणे अशा विविध स्वरुपाच्या कामांचा समावेश आणि इतर ‘मार्गांचा’ अवलंब करण्याची रणनिती वापरली जाते. त्यानुसार भाजपने प्रभाग क्रमांक पंधरा या हक्काच्या प्रभागात पंधरा ते वीस हजार मतांची आघाडी मिळेल, असा अंदाज बांधला होता. ही आघाडी कमी झाली तरी शहराच्या पूर्व भागात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मते कमी कशी होतील यासाठी पुरेपुर यंत्रणा कामाला लागली होती. परंतु हक्काच्या मतदारांनीच केवळ सात हजाराचे मताधिक्य दिले असले तरी धंगेकर यांनी घेतलेली आघाडी कमी होऊ शकली नाही.
दुरंगी लढतीमुळेच मतांची ‘किंमत’ वाढली
कसबा विधानसभा मतदारसंघात शहराच्या मध्यवर्ती भागाचा समावेश होतो. यामध्ये साधारणपणे पुर्व आणि पश्चिम भाग असे भाग निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात. पश्चिम भागात भाजपच्या उमेदवाराने मिळविलेलीी आघाडी ही प्रतिस्पर्धी उमेदवाराला कधीच कमी करता आली नाही. या पूर्व भागात प्रभाग क्रमांक पंधराचा समावेश आहे. या प्रभागात मागील निवडणुकीच्या तुलनेत चार हजाराने मतदान घटले होते. या भागात ब्राम्हण मतदार अधिक असून, तो भाजपचा पारंपारिक मतदार असून, त्यावरच भाजपची भिस्त असते.
ब्राम्हण समाजाची नाराजी लक्षात घेत भाजपकडून पूर्व भागात धंगेकर यांना मतदान कसे होणार नाही. पूर्व भागात धंगेकर यांचे प्राबल्य आहे, ही लढत थेट असल्याने मतविभागणी होणार नव्हती. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला गेला. प्रत्येक मतासाठी दोन ते तीन हजार रुपये मोजले गेल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.