कोल्हापूर : गरिबांच्या रेशन धान्यावर डल्ला मारणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांसह सात जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात विद्यमान कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह एक आयएएस अधिकारी, तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
रेशन धान्य हे सरकारी धान्य गोदाम आणि इतर संबंधित ठिकाणी पोहोचवण्याऐवजी या संशयित आरोपींनी संगनमताने रेशन धान्य परस्पर गायब केले होते. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या निकालानंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सन २००० मध्ये अकोला आणि वाशीम जिल्ह्यांतील सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डवर वितरित करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रुपये किमतीचा ४८ ट्रक गहू वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशीम येथे न पोहाेचल्याने, रेशनचा गहू गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते.
या प्रकरणी अकोल्यातील अकोट पोलिसांनी अकोला येथे एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल गुप्ता यांच्यासह ट्रकचे ड्रायव्हर तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य आरोपीने गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करून हा रेशन घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी अकोल्यातील अकोट पोलिसांनी अकोला येथे एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल गुप्ता यांच्यासह ट्रकचे ड्रायव्हर तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी तसेच इतर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना मुख्य आरोपीने गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करून सदरचा रेशन घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान, पोलिस तपासात गुप्ता, त्याचे ट्रकचे चालक, मॅनेजर, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश मुन्नासिंग चव्हाण, पुरवठा अधिकारी (विद्यमान आयएएस अधिकारी) संतोष पाटील यांच्यावरील दोष सिद्ध झाल्याने न्यायालयानं संशयित आरोपी कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, अशा ७ जणांना शिक्षा सुनावली आहे.
कॉन्ट्रॅक्टर गुप्ताला पाच वर्षांची तर सर्व सरकारी अधिकाऱ्यांना २ वर्षांची शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे २४ वर्षांनंतर हा निकाल लागला आहे. यामध्ये विद्यमान कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचाही समावेश आहे.
सात अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिक्षा
या प्रकरणाच्या तपासात तब्बल ४१ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यात संशयित आरोपी कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सातही सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केले, म्हणून त्यांना दोन वर्षे शिक्षा ठोठावली. ट्रकचालकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे २४ वर्षांनंतर हा निकाल लागला. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील दीपक काटे आणि विद्या सोनटक्के यांनी काम पाहिले.






