कोल्हापूर: प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी अर्ज केलअ होता. त्यावर निर्णय देताना कोल्हापूर कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला आहे. प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली होती. आधी 3 दिवस व नंतर 2 दिवस अशी कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती.
पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला कोल्हापूर कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोरटकरणे जामिन मिळवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने अखेर काही अटी-शर्तीसह जामिन मंजूर केला आहे.
वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया
प्रशांत कोरटकरला जामिन मंजूर व्हावा अशाच प्रकारची कलमे लावण्यात आली होती. गुन्हा नोंदवताना तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा नसलेली कलमे असल्यामुळे साधारणतः अशा प्रकरणात जामिन होत असतो. जामिन देताना कोणती कारणे लक्षात घेतली आहेत ते पाहणे महत्वाचे ठरेल. प्रशांत कोरटकरला जामिन देताना दिलेल्या नियमांचे पालन न् केल्यास आम्ही त्याचा जामिन रद्द करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलेही होते. याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नागपूर येथेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता. मात्र, विविध संघटनांच्या दबाव यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते. त्याला तेलंगणामधून अटक करण्यात आली असून कोल्हापूर न्यायालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे.
परिणय फुके यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर कोर्टाकडून आधी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. मात्र तो पोलिसांकडे कोणताही जबाब देण्यासाठी न आल्यामुळे त्याला अटक करण्याचे कोल्हापूर कोर्टाकडून आदेश देण्यात आले होते. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे. मात्र तो कॉंग्रेस नेत्याच्या घरी लपून बसला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.