
Kolhapur News, Gokul Milk Union, Satej Patil
गोकुळच्या निवडणुकीनंतर आता येत्या 29 ऑक्टोबरला गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र, गोकुळवर सत्ता मिळवण्यात अपयशी झालेल्या महायुतीकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात महायुतीचे नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेऊन महायुती आपली पुढची चाल खेळणार असल्याची चर्चा कोल्हापुरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महायुतीचे नेते फडणवीसांशी चर्चा करतील, असे सांगितले जात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, अध्यक्ष निवडीच्या सभेला गैरहजर राहण्याबाबत महायुतीच्या नवनिर्वाचित संचालकांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. पण, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून आपला उमेदवार दिला जाऊ शकतो. तसे झाल्यास गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीप्रमाणेच अध्यक्षपदाची निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सतेज पाटील यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीचे नेते सहकार्य करतील, त्याबाबत आपण हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि चंद्रदीप नरके यांच्यासोबत आपली आधीच चर्चा झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ दूध संघाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मुलाला अध्यक्ष करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे महायुतीचे नेते वेगळा निर्णय घेतील, असे वाटत नसल्याचे सतेज पाटील म्हणाले.
तसेच, शासनमान्य संचालक किंवा स्वीकृत संचालकांना मतदान करता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. असे मतदान होऊ लागले, तर सहकार क्षेत्रातील निवडणुकांना काही अर्थ उरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.