रोहित पवारांचा निकाल फिरवण्याचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता नव्या वादामुळे चर्चेत आली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या असून महायुतीला 12 जागा मिळाल्याची माहिती आहे. मात्र, एका जागेवरील फेरमतमोजणीनंतर निकाल बदलल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे. (Gokul Result 2026)
गोकुळ दूध संघाच्या 25 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. सुरुवातीच्या कलांमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. मात्र, एका जागेवरील मतांची फेरमोजणी झाल्यानंतर चित्र बदललं.
या फेरमतमोजणीत सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले, तर महायुतीचे अमर पाटील विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बदलामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीच्या जागांची संख्या 13 वर आली, तर महायुतीने 12 जागा मिळवल्या.
फेरमतमोजणीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आक्रमक भूमिका घेतली. निवडणुकीचा कौल स्पष्ट असतानाही सत्तेचा गैरवापर करून अपेक्षित निकाल मिळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे….!
पण…… आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत. पण लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे.
घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही..! @INCMaharashtra
@satejp
@ruturajdyp #GokulElection2026 #गोकुळ — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 19, 2026
निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून निकाल बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. निकाल चोरण्याचा प्रयत्न झाल्यास प्रामाणिक सभासदांकडून तीव्र विरोध होईल, असा इशाराही त्यांनी दिला. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे गोकुळच्या निवडणुकीतील वादाला नवं वळण मिळालं आहे.
उपलब्ध माहितीनुसार, महायुतीच्या तीन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे. निकालात बदल झाल्यास पुढे कोणती पावलं उचलता येतील, यासाठी वकिलांचाही सल्ला घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला 13 जागा, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे समविचारी आघाडीने आवश्यक संख्याबळ मिळवल्याचं चित्र आहे. मात्र, फेरमतमोजणी आणि निकालासंदर्भातील पुढील अधिकृत निर्णयांवर सर्वांचं लक्ष राहणार आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एका जागेच्या फरकाने राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता असल्याने हा वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हं आहेत. रोहित पवार यांच्या आरोपांवर निवडणूक यंत्रणा आणि संबंधित पक्षांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






