
Kolhapur News, Gram Panchayat Election, Gokul Dairy, Maharashtra Politics,
राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर सप्टेंबर महिन्यानंतर गोकुळ दूध महासंघाची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावगाड्यातील स्थानिक नेतृत्व ठरवण्यासाठी जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ८ जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडणार आहे. जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार विविध टप्प्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. (Kolhapur)
८ जून – विशेष ग्रामसभा
१२ जून – आरक्षण सोडत
१७ जून – प्रारूप अधिसूचनेस मान्यता
१९ जून – प्रारूप आरक्षण प्रसिद्ध
१९ ते २५ जून – हरकती आणि सूचना दाखल
२३ जुलै – उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय
८ जुलै – अंतिम अधिसूचनेस मान्यता
१० जुलै – अंतिम आरक्षण प्रसिद्ध
सध्या गोकुळ दूध महासंघाच्या राजकारणामुळे ग्रामीण भागातील वातावरण आधीच ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील अनेक दूध संस्था गोकुळशी संलग्न असल्याने त्याचे थेट परिणाम गावपातळीवरील राजकारणावर दिसून येत आहेत.
सध्या विविध संस्थांमध्ये ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून, कोणत्या गटाच्या बाजूने ठराव द्यायचा यावरून स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने गावपातळीवरील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.