Shirur Politics: शिरूरच्या राजकारणात पुन्हा खळबळबळ! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राजकीय प्रवास हा चढ-उतारांनी भरलेला आणि अभ्यास करण्यासारखा मानला जातो. सुरुवातीचे काही वर्षे आढाळराव पाटील शिवसेनेत होत. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी जवळीक वाढवली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळात ही मैत्री अधिक दृढ झाली. सन १९९९-२००० मध्ये दिलीप वळसे पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांनी भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासाने आढळराव पाटील यांच्याकडे सोपवली होती.
मात्र, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने आढळराव पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणूक लढवली आणि तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांचा निसटता पराभव केला. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते सलग खासदार म्हणून निवडून आले.
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यानंतर आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुढे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दिलीप वळसे पाटील यांच्याशी जवळीक वाढवली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूर मतदारसंघ महायुती घटक पक्षातील वाटपानुसारराष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे स्पष्ट होताच आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली; मात्र शरद पवार गटाच्या लाटेत डॉ. अमोल कोल्हे पुन्हा दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानेविजयी झाले.
दरम्यान, मंचर, नगरपंचायत, राजगुरुनगर, चाकण, जुन्नर नगरपरिषद जिल्हा परिषद आणि स्थानिक निवडणुकांमध्ये आढळराव पाटील यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेतृत्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले. जुन्नरचे आमदार दादा सोनवणे, शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते देविदास दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे “आढळराव पाटील यांना पक्षात घेतल्यास पुन्हा गटबाजी वाढेल,” अशी भावना शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अरुण गिरे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेत गेले आहेत . सद्यस्थिती आढळराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय रवींद्र करंजखेले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशासाठी त्यांच्या समर्थकांकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र, स्थानिक पातळीवरील विरोध, जुन्या राजकीय संघर्षांची पार्श्वभूमी आणि शिवसेनेतील अंतर्गत समीकरणे पाहता आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश म्हणावा तितका सोपा राहिलेला नाही. नेहमी पक्ष बदल व आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देणे हा विषय त्यांच्या दृष्टीने अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत पुणे जिल्ह्याच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आकार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






