
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रविवार आणि सोमवारीही उन्हाचा तडाखा काहीसा कमी राहील. मात्र, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने नागरिक आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
– माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ पुणे
हवामान विभागाकडून दिला होता इशारा
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात ढगांची गर्दी झाली होती. मुंबई आणि कोकण वगळता पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे संकेत हवामान विभागाने आधीच दिले होते. तो अंदाज खरा ठरवत शनिवारी कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली.
काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत उद्य रविवारपासून ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेची आणि किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी हा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवला होता.
पुढील पाच दिवसांच्या हवामान बदलाबाबत माहिती देताना माणिकराव खुळे म्हणालेहोते की, मंगळवार दि. 17 मार्चपर्यंत राज्याच्या हवामानात मोठे बदल जाणवतील. विशेषतः रविवार 15 मार्च आणि सोमवार 16 मार्च या दोन दिवशी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील 28 जिल्ह्यांमध्ये या वातावरणाचा प्रभाव अधिक राहील. दरम्यान, मुंबई आणि कोकण पट्टयात मात्र या पावसाळी वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. पावसाच्या अंदाजापूर्वी राज्याला उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. मात्र, रविवार दि. 15 मार्चपासून तापमानात घट होण्यास सुरुवात होईल.
शेती कामांना वेग, पण सतर्कता हवी
मार्च महिना हा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या उन्हाळी पिकांची कामे जोमाने सुरू आहेत. द्राक्ष, आबा आणि रब्बी हंगामातील उर्वरित कामांवर या अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. जरी हा पाऊस ‘किरकोळ’ स्वरूपाचा असला, तरी मेघगर्जनेमुळे होणारा विजांचा कडकडाट चिंतेची बाब ठरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके सुरक्षित स्थळी हलवावीत, असे आवाहनही अप्रत्यक्षपणे या अंदाजात दडलेले आहे.