
कोल्हापुरात दशकातील नीचांकी पाऊस; वार्षिक सरासरीच्या केवळ ५१ टक्के पर्जन्यमान
शेती, पाणी साठे, नियोजनावर परिणाम
सप्टेंबरमध्ये केवळ चार दिवस पाऊस पडला आहे. तर आईने भात व सोयाबीन काढणीच्या हंगामात स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडल्याने पीक काढणी हंगामात व्यत्यय आला आहे. ऑगष्ट, सप्टेंबर हा साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा महत्त्वाचा महिना मानला जातो. मात्र यंदा संपूर्ण जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये केवळ चार दिवस पाऊस झाला. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये सरासरी १७ दिवस पावसाचे असतात. यंदा पावसाचे दिवस आणि पावसाचे प्रमाण दोन्ही कमी राहिल्याने त्याचा थेट परिणाम शेती, पाणीसाठे आणि आगामी उन्हाळ्याच्या नियोजनावर होण्याची शक्यता आहे.
यंदाची स्थिती सर्वांत खालावलेली
काही भागांत पाऊस झाला असला तरी तो सर्वदूर आणि सलग स्वरूपाचा राहिला नाही. त्यामुळे ‘पडेल तिथे, पडेल तेवढा’ अशा स्वरूपाचा पाऊस झाल्याचे चित्र आहे. २०२६ मधील पर्जन्यमान गेल्या दशकातील सर्वांत कमी असल्याचे स्पष्ट होते. २०२३ मध्ये ९७१ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा त्यापेक्षाही कमी म्हणजे ८९९ मिलीमीटरवर पर्जन्यमान थांबले आहे.
नियोजनासाठी इशारा
यंदाच्या पर्जन्यमानाची आकडेवारी केवळ हवामानातील बदलाची नोंद म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. जिल्ह्याच्या आगामी पाणी नियोजनासाठीही ही आकडेवारी इशारा देणारी आहे. परतीचा पाऊस समाधानकारक झाला तर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मात्र पावसाने पुन्हा ओढ दिल्यास स्बी हंगामापासून पुढील उन्हाळ्यापर्यंत त्याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसावर मदार
कोल्हापूर जिल्ह्यातील खरीप पिके, भात, सोयाबीन, भुईमूग तसेच इतर पिकांसाठी पावसाचे सातत्य महत्वाचे असते. यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे काही भागांत पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आता परतीचा पाऊस किती आणि कधी पडतो, यावर पुढील परिस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला नाही, तर त्याचा परिणाम केवळ खरीप पिकांपुरता मर्यादित राहणार नाही. रब्बी हंगामातील पेरणी, जमिनीतील ओलावा, विहिरींची पाणीपातळी आणि उन्हाळ्यातील पाणी उपलब्धता यावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. यंदाच्या मान्सूनमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्यमानातही मोठी तफावत दिसून आली आहे. एका बाजूला पुणे आणि सातारा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस, तर दुसरीकडे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मोठी तूट अशी स्थिती आहे.