Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर; 29 फुट पातळी अन् राजाराम बंधारा...
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून यामुळं पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. तसंच, या मार्गावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
राधानगरी धरणातून ३१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू आहे. परिणामी कोल्हापूरची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ६३ टक्के भरलं आहे. जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगे धरणाचा समावेश असून नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.
जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे आळवे, यवलुज बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून भोगावती नदीवरील हळदी राशिवडे, शिरगाव, कोगे दुधगंगा नदीवरील दत्तवाड यासह जिल्ह्यातील २४ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.
Pune Breaking: पुण्यात कोसळधार; खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सध्याची स्थिती काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण असलेलं राधानगरी धरण मुसळधार पावसामुळं ६३ टक्के भरलं आहे. या धरणातून विसर्ग भोगावती नदीपात्रात केला जात आहे. यामुळं जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोमवारी मध्यरात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळं आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी २९ फूट ११ इंच इतकी नोंदली गेली असून पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं आता दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. काळम्मावाडी धरणाजवळील पाटपन्हाळा येथे आज पहाटे दरड कोसळल्यामुळं नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं आहे. दरड कोसळलेल्या गावात तात्काळ उपयोजना करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी मुसळधार पावसामुळं होणाऱ्या आपत्तीबाबत प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या असल्याचं अनित देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, दोन वर्षांपूर्वीही मुसळधार पावसामुळं या ठिकाणी भूस्खलन झालं होतं. मात्र शासनानं कोणत्याही उपाययोजना न केल्याची तक्रारही यावेळी ग्रामस्थांनी केली.