खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला (फोटो- तेजस भागवत)
पुणे: पुणे शहरात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेले काही दिवस पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. मात्र आज पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून सध्या 7,700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सकाळी 11 पर्यंत 3,883 क्युसेक वेगाने पाण्याच्या विसर्ग सुरू होता. मात्र आता हा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आता 7,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 3883 क्युसेक्स विसर्ग वाढवुन सकाळी 11:00 वा. 7700 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
– मोहन शां.भदाणे,
उपविभागीयअभियंता
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, पुणे
खडकवासला धरण किती टक्के भरले?
पानशेत, टेमघर, वरसगाव या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात पाणीसाठा वाढत आहे. सध्या खडकवासला धरण 64 टक्के भरले असल्याचे समजते आहे. सध्या धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि उपनगरात देखील पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो.
कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
राज्याच्या अनेक भागात हलका-मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला पुढील दोन दिवसात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.