
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान शहरातील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीसोबत ओळख करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिला मंगळसुत्र घालून लग्न केल्याचे भासवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सप्टेंबर 2022 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान, कोंढवा, उंड्री, वानवडी, सोलापूर येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन देवून सोलापूर येथे घेऊन गेला. त्याठिकाणी एका रुममध्ये पीडित तरुणी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच मुलीला मंगळसुत्र व लग्नातील साज घालून लग्न केल्याचे भासवले. यानंतर मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी येवून जावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न केल्याचे भासवून दिशाभूल करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
विकासनगर, वानवडी येथील 19 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.17) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनिकेत पुनमचंद राठोड (वय-27 रा. एस.आर.पी.एफ. गेट समोर विकासनगर, वानवडी) याच्यावर आयपीसी 376, 376(2) (एन), 417 नुसार गुन्हा दाखल करुन शनिवारी अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील करीत आहेत.