कुर्डुवाडी : परंडामार्गे कुर्डुवाडीहून कर्नाटक राज्यात जाणारा सुमारे ८ लाख ५२ हजारांचा ३० टन तांदूळ कुर्डुवाडी पोलिसांनी दि. १६ रोजी बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत परंडा चौकात पकडला. या घटनेला दोन दिवस उलटले, मात्र गुन्हा कोणी दाखल करायचा, यासाठी माढा पुरवठा विभाग व कुर्डुवाडी पोलिस हे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अद्यापही हा गुन्हा नोंद होऊ शकला नाही.
येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे व इतर कर्मचारी ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेअंतर्गत कुर्डुवाडी शहरा नजीक असणाऱ्या परांडा चौकात गस्त घालत असताना बुधवारी पहाटे ट्रक(एमएच १२, एलटी ७३४८) हा संशयतरित्या ३० टन तांदूळ परंड्याकडून घेऊन येत असलेला त्यांना दिसले. त्याची किंमत ८ लाख ५२ हजार अशी होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रक चालकास विचारणा केली असता त्याने प्रथम कर्नाटक राज्यातील एका गोडवानमधील बिल्टी व इतर कागदपत्रे पोलीस पथकाला दाखवली. पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात कर्नाटक राज्यातील शासकीय वितरित होणारा तांदूळ हा आपल्या भागातून कसा काय पुरवठा होऊ शकतो? याबाबत मोठा संशय आल्याने त्यांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यासमोर आणून लावला. तो तांदूळ कर्नाटक राज्यातील पुरवठा विभागातील गोण्यात असल्याने याबाबत संबंधित गोण्यात असलेला तांदूळ हा नेमका रेशनींगचा का बाजारातील आहे, याची खातरजमा करण्यासाठी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी माढा पुरवठा विभागाकडे याबाबत चौकशी करून त्याचा अहवाल देण्याबाबत मागणी केली. त्यानुसार बुधवारी रात्री उशिराने माढा पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंतलवाड कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात आपल्या पथकासह हजर झाले आणि त्यांनी संबंधित गोण्यातील नमुने गोळा करून सोबत घेतले.
गुरुवारी दुपारी माढा पुरवठा विभागाकडून पोलिस ठाण्याला संबंधित गोण्यात आढळलेला तांदूळ हा रेशनिंगचा असल्याचा संशय येत असल्याबाबतचा अहवाल देत त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
अस्पष्ट अहवालाने पाेलीस बुचकळ्यात
पुरवठा विभागाकडून आलेल्या लेखी अहवालात हा माल रेशनिंगचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र नेमकी भूमिका स्पष्ट न केल्याने येथील पोलीस अधिकारी गुन्हा कोणी दाखल करायचा, या बुचकाळ्यात पडले. त्यांनी गुरुवारी पाचच्या सुमारास पुन्हा तहसीलदारांना लेखी पत्र व्यवहार करत गुन्हा दाखल करण्यासाठी पुरवठा विभागाकडील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पाठवण्याचे विनंती केली. तहसील विभागाकडून गुरुवारी रात्रीपर्यंत कोणताही अहवाल न मिळाल्याने उशिरापर्यंत या तांदळाच्या गैरव्यवहाराबाबत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
[blockquote content=”आमच्या पथकाला संशयितरित्या सापडलेल्या तांदळाच्या ट्रकमधील तो तांदूळ रेशनिंगचा का बाजारातील हे तपासण्याचे अधिकार फक्त पुरवठा विभागाकडे आहेत. याबाबत माढा पुरवठा विभागाकडे तांदळाची तपासणी करून अहवालाची मागणी केली, परंतु तो अहवाल स्पष्ट व योग्य आला नसल्याने गून्हा कोणी दाखल करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसीलदारांकडे पुन्हा अहवालाची मागणी केली आहे. तो आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.” pic=”” name=”- गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक, कुर्डुवाडी”]
[blockquote content=”कुर्डुवाडी पोलिसांनी पकडलेल्या त्या ट्रकमधील तांदळाच्या गोण्या कर्नाटक राज्यातील पुरवठा विभागाकडील असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संशय व्यक्त होत असल्याने संबंधितावर कारवाई करण्याबाबतचा अहवाल कुर्डुवाडी पोलिसांना दिला आहे. पुढील कारवाई ते करतील.” pic=”” name=”- ज्ञानेश कुंतलवाड, पुरवठा निरीक्षक, माढा”]