
भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
Lab Grown Diamond : भारताने लॅबग्रोन डायमंडच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी उत्पादनापासून ते ब्रँडिंग आणि विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी देशातच उभी करावी, असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित 52 व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळ्यात ते बोलत होते.
लॅबग्रोन डायमंडच्या निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री, दागिन्यांचं उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जगभरातील विक्री व्यवस्था अशा प्रत्येक टप्प्यावर भारतीय उद्योगाने आपली ताकद वाढवावी, असं शाह यांनी सांगितलं. या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, भारतीय कंपन्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्योजकतेची ताकद आहे. त्यामुळे केवळ उत्पादन वाढवण्याऐवजी भारतीय कंपन्यांनी स्वतःचे जागतिक ब्रँड निर्माण करून प्रमुख शहरांमध्ये विक्री केंद्रं उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाहीही शाह यांनी दिली.
रत्न आणि आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. या उद्योगाला महाराष्ट्राबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असंही सांगण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील प्रस्तावित जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून सुमारे 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. या पार्कचं काम दसऱ्यापासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुरत हे हिरे कटिंग आणि पॉलिशिंगचं मोठं केंद्र असून, जगभरातील पैलू पाडल्या जाणाऱ्या हिऱ्यांपैकी मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया होते. भारताचा रत्न आणि आभूषण उद्योग देशाच्या निर्यातीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
वर्ष 2025 मध्ये भारताची रत्न आणि आभूषण निर्यात 2 लाख 44 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 6.3 टक्के असून, सुमारे 75 लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि ब्रिटनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेत भारतीय उद्योगाने नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करावा, असंही शाह यांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रत्न आणि आभूषण उद्योगाचं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित केलं. महाराष्ट्राचा भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मोठा वाटा असून, भविष्यात हा उद्योग रोजगार आणि गुंतवणुकीचा महत्त्वाचा आधार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स 2026’ मध्ये उद्योगातील विविध 27 श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, महिला उद्योजक आणि इतर मान्यवरांचा गौरव करण्यात आला.