मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल
कल्पना करा कि 3 हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेला एखादा व्यक्ती मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागला तर काय होईल? एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे काहीसे चित्र मुंबईतील रस्त्यांवर नुकतेच पाहायला मिळाले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कोट्यवधींची संपत्ती असलेल्या भिकाऱ्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
सादर व्हिडियोत दिसत असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह हे आहेत. या व्हिडीओमध्ये कोट्यवधींचे मालक असलेले पराग शाह चक्क भिकाऱ्याच्या वेषात घाटकोपरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला. पण नंतर या सगळ्या प्रकारामागचं कारण समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरू नम्रमुनी यांच्या सांगण्यावरून पराग शाह यांनी एक दिवस भिकारी म्हणून जगण्याचा अनुभव घेतला. सध्या जैन धर्मीयांचा चातुर्मास सुरू असून याच काळात त्यांना हा अनुभव घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
गुरूंच्या या सूचनेनंतर पराग शाह यांनी आपली सुरक्षा व्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तू बाजूला ठेवल्या आणि थेट भिकाऱ्याचा वेष धारण केला. त्यानंतर ते काही तास घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरले. त्यांनी लोकांकडून भीक मागितली, मिळालेलं अन्न खाल्लं आणि रस्त्याच्या कडेला बसून सामान्य भिकाऱ्याचं आयुष्य जवळून अनुभवण्याचा प्रयत्न केला.
घाटकोपर चे कोट्याधीश आमदार पराग शहा जेव्हा वेषांतर करून घाटकोपर च्या रस्त्यावर भिकारी बनून फिरतात…!!!
आपल्या गुरूने दिलेली आज्ञा पाळून पाच हजार कोटी चे मालक असलेले आमदार पराग शहा यांनी एक दिवस त्यांच्या मतदार संघ घाटकोपर पूर्व मध्ये भिकारी बनून दिवस काढला..!!
तेव्हा काय घडले पहा pic.twitter.com/eEXw9I1joo — Siyadivinelybeautyful 🇮🇳 (@Siya83377032) September 13, 2026
विशेष म्हणजे, हा अनुभव फक्त वेष बदलण्यापुरता मर्यादित नव्हता. ज्या-ज्या ठिकाणी ते गेले, तिथे नंतर मेकअप काढून ते पुन्हा गेले आणि संबंधित लोकांशी संवाद साधला. त्यामुळे नेमकं काय जाणवलं, लोकांची प्रतिक्रिया काय होती, याचाही त्यांनी अनुभव घेतला. त्यामुळे हा सगळा प्रकार एखाद्या सिनेमातील सीनसारखा वाटत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
पराग शाह यांच्या संपत्तीचीही या निमित्ताने चर्चा रंगली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी तब्बल 3383 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते.
रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय असलेले पराग शाह यापूर्वी महानगरपालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत. आता मात्र त्यांचा हा अनोखा प्रयोग राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.






