कर्मचारीच नसल्याने तासगाव विश्रामगृहाला टाळे लावण्याची वेळ; पाचपैकी तीन पदे रिक्तच
तासगाव : तासगाव शहरातील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह कर्मचारी नाही म्हणून बंद करण्यात आले आहे. सदर विश्रामगृहसाठी मंजूर पाच कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधापैकी तीन पदे रिक्त आहेत. तर एक कर्मचारी रजेवर गेला आहे. एका कर्मचाऱ्यावर विश्रामगृह चालू ठेवणे शक्य नाही म्हणून सदर विश्रामगृह बंद करण्यात आल्याची माहिती उपअभियंता आकाश हुद्दार यांनी दिली आहे.
तासगाव येथील विश्रामगृहासाठी एक चौकीदार, एक खानसमा, तीन कक्षसेवक आणि एक माळी/मैलमजूर असा पाच कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर आहे. यापैकी चौकीदार पद गेली अनेक वर्षे रिक्तच आहे. तर दोन वर्षांपूर्वी खानसामाची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा खानसमा देण्यात आलेला नाही. तीन कक्षसेवकांपैकी दोन कक्षसेवक दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यापासून ही दोन पदे रिक्तच आहेत.
एक कक्षसेवक आणि एक माळी अशा दोन कर्माचाऱ्यांच्या जीवावर विश्रामगृह चालू ठेवलेले होते. यापैकी एक कर्मचारी रजेवर गेला. उर्वरीत एका कर्मचाऱ्यांच्या जीवावर विश्रामगृह सुरू ठेवता येणे शक्य नसल्याने बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.
राज्यातील एकमेव विश्रामगृह
गेल्या दोन वर्षांपासून पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आलेले राज्यातील एकमेव विश्रामगृह असल्याचे बोलले जात आहे. देशात सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार रोहित पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अभिनेते भरत जाधव यांना बसला फटका
ज्येष्ठ सिने आणि नाट्य अभिनेते भरत जाधव येत्या 18 एप्रिल रोजी एका नाटकाच्या प्रयोगासाठी तासगाव शहरामध्ये येत आहेत. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह बुक करायला गेल्यानंतर सदर विश्रामगृह कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाच्या या निर्णयाचा फटका अभिनेते भरत जाधव यांना बसला आहे. त्यांना विश्रामगृह देण्यास नकार देण्यात आला आहे.