चार वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला; बिबट्याने ऊसाच्या शेतात फरफटत नेले पण आजोबांनी...
शिराळा : गिरजवडे पैकी मुळीकवाडी (ता. शिराळा) येथील आजोबांसोबत शेतात गेलेल्या आरव अमोल मुळीक (वय ४) या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात आरव हा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि ६) साडे पाचच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बजरंग मुळीक हे आपला नातू आरवसोबत गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक उपस्थित होते. त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरववर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. त्यावेळी काशिनाथ मुळीक यांनी धावत जाऊन आरवची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
हेदेखील वाचा : Nashik : नाशिक हादरलं ! वडनेर रोडवर २ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला
आजोबा बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी त्यानंतर त्यास दुचाकीवरून उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती सरपंच सचिन देसाई यांनी वनविभागाला दिली. त्याच्यावर डॉ. अनिरूद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे. यावेळी वनविभागाचे एकनाथ पारधी, अनिल वाजे, स्वाती कोकरे, प्राणीमित्र प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांनी भेट दिली.
कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु
आमदार सत्यजित देशमुख यांच्या सूचनेनुसार, पुढील उपचार कराड येथील कृष्णा चॅरिटेबल रुग्णालयात सुरू आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी भेट देऊन विचारपूस केली.
काही वेळातच दुसरीकडेही झडप
त्यानंतर काही वेळातच त्याच बिबट्याने घागरे वाडी येथील विक्रम खोचरे यांच्या घराच्या बांधकाम कामावर असणाऱ्या योगेश कुरणे, भरत नायकल, सुजित शिरतोडे (सर्व रा.पेठ) या कामगारांच्या दुचाकीवर झडप घातली. मात्र, सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले. यावेळी सरपंच सचिन देसाई, आनंदा मोंडे, सुखदेव मुळीक, महेश मुळीक, प्रशांत पाटील उपस्थित होते.
नाशिकमध्येही बिबट्याचा हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील वडनेर रोडवर बिबट्याने हल्ला केला. कारगिल गेट आर्मी कॉर्टरमध्ये घराच्या अंगणात खेळत असलेल्या २ वर्षीय रुचिक चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि फरफटत जंगलात नेले. वडिलांनी त्यावेळी बिबट्याचा पाठलाग केला होता. त्यानंतर आता शिराळा येथे बिबट्याने हल्ला केला.