
Leopard spotted in Vadgaon Maval during hunting hunt Fear among the villagers
Leopard Attack : वडगाव मावळ : राज्यामध्ये सध्या बिबट्यांनी मानवी वस्त्यांमध्ये केलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा आहे. बिबट्या शिकारीच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये घुसूत असून पाळीव गाई-गुरे, गावातील भटकी कुत्री आणि अंगणात खेळणारी लहान मुलं यांच्यावर हल्ला करत आहे. ऊसाच्या शेतासह आता रानावनात आणि अगदी गावात बिबटे हल्ला करत आहेत. पुण्यातील औंध भागामध्ये देखील बिबट्या दिसला असल्याचे बोलले जात आहे. वडगाव मावळमध्ये देखील बिबट्या दिसून आला आहे.
मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात बिबट्याची दहशत कायम असताना, काल (दि.25 नोव्हेंबर) रात्री शिकार शोधत फिरत असलेला बिबट्या ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे आणि धाडसी भूमिकेमुळे परत पळाला. प्रगतशील शेतकरी दिलीप राक्षे आणि गावातील काही तरुणांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन बिबट्याला हुसकावून लावण्यात यश मिळवले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा शेताजवळ हालचाल ऐकू आली तसेच कुत्र्यांच्या सलग भुंकण्यामुळे संशय निर्माण झाला. तपासणीसाठी गेलेल्या तरुणांना अंधारात बिबट्याचे स्पष्ट दर्शन झाले. लगेचच दिलीप राक्षे यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना सतर्क केले आणि सर्वांनी मिळून आवाज, टॉर्चचा प्रकाश आणि साधनांचा उपयोग करून बिबट्याला परत जंगल भागाकडे हुसकावले. या प्रसंगानंतर गावात भीती आणि सावधगिरीचे वातावरण आणखीनच वाढले आहे. बिबट्याचा वावर सतत असल्यामुळे रात्री गावातील हालचाल लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. शेतकरी जनावरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क झाले आहेत.
दरम्यान, बिबट्याचा वावर वाढत असल्याने नागरिकांमध्ये स्पष्ट भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ग्रामस्थांचे म्हणणे आहे, “बिबट्या रोजच्या रोज गावाच्या हद्दीत फिरताना दिसत आहे. त्वरीत कारवाई झाली नाही तर कोणतीही दुर्घटना घडू शकते.” सध्या वनविभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, साळुंब्रे परिसरात तणावाचे आणि सतर्कतेचे वातावरण कायम आहे.
पुण्यातील औंध भागामध्ये बिबट्याचे दर्शन
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर आणि शहर परिसरात बिबट्याने दर्शन दिले. पुणे विमानतळ परिसरात, सिंहगड रोड परिसरात बिबट्याने दर्शन झाल्याचे दिसून आले आहे. मात्र आता बिबट्याने थेट पुण्याच्या शहरी भागात दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या औंध परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने औंध परिसरात शोध मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले आहे. मतर त्यानंतर अजूनही हा बिबट्या कुठे दिसून आलेला नाही. त्यामुळे वनविभाग त्याचा शोध घेत आहे.