
पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी
पूर्वी किल्ले पुरंदर परिसरातील काळदरी, पानवडी, चीव्हेवाडी आणि दक्षिण भागातील काही गावांपर्यंतच बिबट्यांचे अस्तित्व होते. त्या भागातील शेतकरी त्यामुळेच त्रस्त झाले होते. परंतु आता ही हालचाल दिवे घाट, बोपदेव घाट ओलांडून सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी या गावांपर्यंत पोहोचली आहे. या परिसरात कोल्हे, लांडगे, तरस, मोर, हरीण, ससे, रानडुक्कर यांची संख्या मोठी असल्याने बिबट्यांना शिकारीसाठी अनुकूल परिस्थिती मिळू लागली आहे.
उसाच्या क्षेत्रवाढीमुळे बिबट्यांना सुरक्षितता
पुरंदरचा पूर्व भाग पारंपरिकरीत्या दुष्काळी मानला जात होता. फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती होत होती. पुरंदर उपसा योजनेंनंतर मात्र विविध पिकांसह अलीकडे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या भागात उसाच्या दाट शेतीमुळे बिबट्यांना लपून बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या सर्वच गावांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचा वारंवार सामना करावा लागत आहे.
प्रजनन वाढीचा गंभीर धोका
या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसत असून, तेच त्यांचे स्थायी ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वनपुरी येथे गाभण असलेली वाघीण शेतकऱ्यांच्या नजरेस पडली. तिच्या वीण झाल्यानंतर किमान सात–आठ पिल्लांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या असलेली बिबट्यांची संख्या पाहता आगामी काळात त्यांच्या प्रजननात वाढ होणे हा स्थानिकांसाठी गंभीर धोका ठरू शकतो. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
वन विभागाने तातडीने पावले उचलावीत
बिबट्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे शेतकरी सतत भयभीत आहेत. काही दिवसांपूर्वी वनपुरी येथे वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली, मात्र त्यांना कोणताही ठसा किंवा हालचाल आढळली नाही. तरीदेखील इतर भागातील माहिती मिळूनही विभागाने मोठा ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या नेमकं काय?
सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वनपुरीत आमच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली; मात्र कोणतेही ठसे किंवा बिबट्याचे हालचालीचे चिन्ह दिसले नाही. तरीही जिथे बिबट्यांचा वावर आहे, तेथील मागणीनुसार आवश्यक ठिकाणी पिंजरे बसवले जातील. आमचे कर्मचारी सतत त्यांचा मागोवा घेत आहेत. शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फेक फोटो पुढे पाठवू नयेत.”