Pune Educational News: पुणे जिल्ह्यात ४६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; प्रवेशपूर्वी शाळेची मान्यता तपासा
काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत. याशिवाय काही शाळांना इरादापत्र आहे. पण त्यांनी अंतिम सरकारी मान्यता नाही,आदी बाबी प्रकाशात आल्या आहेत.
पुणे, शहर प्रतिनिधी : पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहेत. हे टाळण्यासाठी पाल्याचा प्रवेश घेण्यापुर्वी संबंधित शाळा अधिकृत आहे की नाही, हे आधी तपासून पहा. पुणे जिल्हा परिषदेचा प्राथमिक विभागाने शहर व जिल्ह्यातील ४६ अनधिकृत शाळांची यादीच जाहीर केली आहे. शिवाय या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी केले आहे.
आजपासून (दि.१६ जून सोमवार) यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे सध्या पालकांची आपापल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. या धामधुमीत प्रवेश मिळत नसल्याने अनेकदा अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश होण्याचा धोका असतो. यासाठी अगोदर अनधिकृत शाळांची यादी तपासून घेणे अनिवार्य आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात काही शाळांना सरकारची मान्यता नाही. काही शाळांना सरकारी मान्यता आहे, पण त्या शाळा मूळ जागेवर भरतच नाहीत. याशिवाय काही शाळांना इरादापत्र आहे. पण त्यांनी अंतिम सरकारी मान्यता नाही,आदी बाबी प्रकाशात आल्या आहेत. तरीसुद्धा अशा अनधिकृत शाळाही अधिकृत मान्यता नसतानासुद्धा शाळा प्रवेशाची जाहिरात करत असल्याचे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका (गट) शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. या सर्वांनी आपापला शाळा तपासणी अहवाल पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केला आहे.
या अहवालानुसार १३ शाळा पुर्णपणे अनधिकृत, ९ शाळांना सरकारी मान्यता आहे, पण ईरादापत्र नाही. शिवाय अन्य २४ शाळांकडे इरादापत्र आहे. पण अंतिम सरकारी मान्यता नसल्याचे आढळून आले असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले.
पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ४६ शाळा अनधिकृत आहेत. नागरिकांना या शाळांची माहिती व्हावी, जेणेकरून त्यांची संभाव्य फसवणूक टळेल, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांनी या अनधिकृत शाळांमध्ये आपापल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये. अन्यथा आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होईल.
– संजय नाईकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे.
अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे आहे.
१) सरकारी मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा (एकूण १३)
– एसपी इंग्लिश मिडियम स्कूल आव्हाळवाडी, वाघोली, ता. हवेली.
– कलर स्कूल ताथवडे, ता. मुळशी.
– न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे, ता. हवेली.
– किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा, ता. मावळ.
– माय स्कूल ताथवडे, ता. मुळशी.
– ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीचे न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल,बिबवेवाडी, पुणे शहर.
– स्वामी विवेकानंद एज्युकेशन फाउंडेशन नांदेड पुणेचे आयडियल पब्लिक स्कूल धायरी, पुणे.
– जीवन मित्र एज्युकेशन सोसायटी पुणेचे महात्मा गांधी प्रशाला संजय पार्क इंग्लिश स्कूल, पुणे शहर.
– तकवा एज्युकेशन ट्रस्टचे टीम्स तक्रया इस्लामिक स्कूल अँड मक्ताब कोंढवा खुर्द, पुणे.
– समर्पण ख्रिश्चन ट्रस्टचे सेंट व्हयू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रूक, पुणे.