दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात भरती असलेल्या सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची अपडेट
Sonia Gandhi Health Update: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी (१५ जून) रात्री अचानक दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटाशी संबंधित समस्येमुळे त्यांना गॅस्ट्रो विभागात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती अहवालातून समोर आली हे. जूनमध्ये ७८ सोनिया गांधी यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तथापि, रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. तर पक्षाचे नेते आणि त्यांच्या समर्थकांनी सोनिया गांधींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या आठवड्यातच ७ जून रोजी सोनिया गांधी यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.त्यांना चाचण्या आणि तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, चाचण्या झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधी यांची प्रकृती चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोनिया गांधींना कधीकधी पोटाच्या समस्या तसेच श्वास घेण्याच्या समस्या येतात. कोरोना काळातही त्यांना रुग्णालया दाखल करण्यात आले होते.
सोनिया गांधी १९९७ मध्ये काँग्रेस पक्षात सामील झाल्या आणि १९९८ मध्ये पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००४ आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार स्थापन केले. तथापि, त्यांनी पंतप्रधान होण्याची ऑफर नाकारली आणि डॉ. मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.