शिरोळ: अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ठोस कायदेशीर पावले उचलली जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, रविवारी (दि. १८ मे) सकाळी १० वाजता अंकली टोल नाक्यावर सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील सर्व पक्ष आणि संघटनांनी या आंदोलनात ‘पूरग्रस्त नागरिक’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात अाले आहे.
शिरोळ येथील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस आमदार अरुण लाड, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, धनाजी चुडमुंगे, आदित्य पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास पाटील, माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, वैभव उगळे, दीपक पाटील, फेडरेशनचे विक्रांत पाटील, शेखर पाटील, शैलेश आडके, चंगेजखान पठाण, आदम मुजावर, शहाजी गावडे, राजू आवळे, दीपक गायकवाड, अजित देसाई आदी उपस्थित होते. संघर्ष समितीकडून तालुक्यातील सर्व पूरबाधित नागरिकांनी या आंदोलनात आपल्या वाहनांसह सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारचे समस्येकडे दुर्लक्ष
अलमट्टी धरणात २००५ साली प्रथमच पाण्याची पातळी ५१९.६६ मीटरवर नेण्यात आली आणि त्याच वर्षी महाराष्ट्रात महापूर आला. त्यानंतर ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापूराची तीव्रता अधिक असल्याचे निरीक्षण आहे. अनेक अहवालांमध्ये या भागातील पूरस्थितीस अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. तरीही सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन उभारण्यात येत आहे. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
शिरोळमध्ये नियोजन बैठक
दरम्यान चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, नियोजनासाठी शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर शिरोळ तालुक्यातील नेते व नागरिकांची व्यापक बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले आहे.
नेत्यांकडून कोरडी सहानुभूती
पुराचे घरात पाणी जाऊन नुकसान झाल्यानंतर त्या घरांना भेटी देऊन डोळ्यात अश्रू आणून कोरडी सहानुभूती दाखवणाऱ्या पुढारी व कार्यकर्त्यांनीही १८ तारखेच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हावे, अशी विनंती युवा सामाजिक कार्यकर्ते शैलेश आडके यांनी यावेळी केली.