
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra State Budget Session) 2023-24 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मांडणार आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेवर आल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय असणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे. हा महाअर्थसंकल्प असेल आणि जन संकल्प असेल, असं सूतोवाच फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यापूर्वीच आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला आहे. यामध्ये आगामी आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांमधील राज्याचा विकासदर कसा राहिलं हे जाहीर करण्यात आलं आहे. तसेच राज्याचा विकास दर हा 6.8 टक्के राहिलं असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. तर देशाचा विकासदर 7.0 टक्के राहण्याचा अंदाज वर्तणवण्यात आला आहे. कृषी आणि कृषीविषयक क्षेत्रात 10.2 टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के तर सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ होणं अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
राज्याचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा 0.2 टक्के कमी असेल. राज्याच्या कृषी क्षेत्राने समाधानकारक कामगिरी केली आहे. या अहवालानुसार 2021-22 मधील 3,62,133 कोटी रुपयांच्या तुलनेत 2022-23 चा महसूल 4,03,427 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे अंदाज
राजकोषीय तूटीचे उत्पन्नाच्या तुलनेत असलेले प्रमाण २.५ टक्के असेल. प्रत्यक्ष महसुली जमा २,५१,९२४ कोटी रुपये (६२.४ टक्के) आहे. तर महसूली खर्च ४.२७,७८० कोटी अपेक्षित आहे.
मान्सूनच्या आधारावर कृषी क्षेत्राची वाढ
राज्यात गेल्या वर्षी अंदाजे १९८.८ टक्के सरासरी पाऊस पडला. २०२२-२३ च्या खरीप हंगामात १५७.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया, कापूस व ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे अंदाजे १० टक्के, १९ टक्के, ५ टक्के व ४ टक्के वाढ अपेक्षित असून कडधान्याच्या उत्पादनात ३७ टक्के घट अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष २०२२ -२३ च्या रब्बी हंगामामध्ये ५७.७४ लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली.